सदानंद शेणवी
-
नुकतेच प्रकाशित केलेल्या रचना
आर्चिव्ह्ज
प्रवर्ग
सदानंद शेणवी
मूलांवर संस्कार करत असतांना विवेका सोबत अनाहूत पणे आपण त्यांना विरोधही शिकवू लागतो. रांगणारं मूल जेव्हा एखाद्या वस्तूला आपटतं आणि रडतं, तेव्हा त्याचं रडणं थांबवण्याकरता आपण “हात् रे!” असं म्हणून आपण त्या वस्तूला मारतॊ. मूल थोडं मोठं होतं, कोणीतरी त्याला रागवतं. पुन्हा रडणं, पुन्हा समजूत. आपण म्हणतो “अमक्या-तमक्याचं घर उन्हात बांधू!” मूल आणखी थोडं मोठं होतं. आपल्या बोलण्याचा अर्थ समजू लागतं. एखाद वेळेस थोरली बहिण असते, काहीतरी खोडया केल्या म्हणून रागवते, फटकावते. आपण तत्परतेने सांत्वन करतो, म्हणतो “उद्याच्या-उद्या ताईचं लग्नं लावून टाकूया!”
का?….. असं का? भावनांची जाणिव देत असतांना नेमकं आपण मुलांना नकारात्मक विचार का शिकवतो?….. “विरोधा” बरोबर “अविवेक” का शिकवतो?
का?….. आपल्या आई-वडीलांनी हे सर्व आपल्याला असंच जाणवून दिलं म्हणून…..?
सदानंद शेणवी.
प्रत्येक व्यक्तीचा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. कोणी पंचपक्वान्नाचं ताट समोर असुनही हपापलेला, तर एखादा एकवेळच्या अन्नाला मोताद असुनही हसतमुख. समाधान मोजण्याकरता प्रत्येकाचा मापदंड वेगवेगळा. माणसाच्या बाबतीत सर्वात मजेची गोष्ट ही असते की त्याला दुखः मोजण्यासाठी नेहेमी स्वताःचा तराजू हवा असतॊ, आणि सुख मात्र दुसर्याच्या तराजूने तोलायचं असतं.
समाजातली ही माणसं मला नेहेमी टांगेवाल्यांसारखी भासतात. टांग्यामध्ये प्रवासी नसला तरीही कठड्यावर बसलेली. स्वताःच्या रिकाम्या टांग्यात रेलून बसणारा एखादाच भेटतो.
जुन्यापुराण्या कपड्यांची गाठोडी बांधून पलंगात, कपाटावर जिथे जागा मिळेल तिथे घुसडावीत, तसं माणूस आपल्या अपेक्षा स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात कोंबत असतो….. अपेक्षांवर अपेक्षा. अपेक्षंचा हा ढिग डोंगरा एवढा झाला, की त्याला अचानक प्रारंभीच्या अपेक्षांची आठवण होते. मग कुठेतरी तळात, कोपर्यात दडपल्या गेलेल्या त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माणूस स्वतःच्या वास्तवा बरोबर झगडा सुरू करतो. पार आस्तित्व धुळीला मिळे पर्यंत.
वास्तव बदलण्याकरता अस्तित्व पणांला लावणार्या ह्या माणसांना आयुष्यातले संधीचे क्षण का दिसत नाहीत? खरतर संधीचे हे क्षण प्रत्येकालाच दिसत असतात. पण….. कोणाला ते उचलण्याचे कष्ट नको असतात, तर कोणाला ते उचलण्याकरता वाकायचं नसतं. ज्यांना उचलण्याचे कष्ट नको असतात त्यांचं एक ठिक आहे. माणूस आळशी आहे, तो महत्वाकांक्षी नाही अशी दूषणं देवून दुर्लक्ष करता येतं. अर्थात हे पण गैरच. परंतू वाकणार नाही असं म्हणणार्या माणसांना काय म्हणावं? ही अशी माणसं अपेक्षा बाळगण्यापेक्षा त्या लादण्यातच जास्त उत्सुक आणि आग्रही असतात. आपला हा अहंकार कुरवाळण्याच्या धुंदीत त्यांना मिळवण्या ऐवजी घालवतोय जाणवतच नाही.
समाजातल्या दहा पैकी नउ घरांमध्ये हच घोळ असतो, किमान शहरी संस्कृतीत तरी नक्कीच. पतीला आपली पत्नी आदर्श हवी असते आणि पत्नीला आपला पती. आदर्शवादाच्या फूटपट्टया मात्र दोघांच्याही भिन्न. दोघेही आपआपल्या जागी अडलेले. अशावेळी मग एकमेकांच्या अपेक्षा एकमेकांवर लादणं सुरू होतं. आपल्या जोडीदाराला “काय आवडतं” ह्या पेक्षा “काय हवं” हेच फक्त दिसत राहातं. जोडीदारावर लादलेल्या, आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी अजून एक अपेक्षा माणूस करू लागतो. “पहले आप। पहले आप।” च्या ह्या अहमकीत आयुष्याची गाडी मात्र दूर निघून जाते.
सुखी आयुष्याचं एक छोटसं सूत्र. “जेवढं द्याल तेवढं मिळेल.” पण हे सूत्र यशस्वी करण्याकरता वाकवं लागतं.
“देणार्याचा हात हा नेहमी वर असतो. उलटा असला तरीही!”
सदानंद शेणवी
एक शेत हे शेतकर्याचं सर्वस्व असतं. ते राखण्याकरता तो कित्येक संकटांना तोंड देत असतो. त्याचं सारं आयुष्य तो ते पिकवण्या करता घालवतो, पण तो हा विचारच करत नाही की तो येण्यापूर्वी हे शेत कैक लोकांनी कसलं असेल, आणि त्याच्या पश्चात कैक जण ते शेत कसत रहाणार आहेत.
आपल्याला एक रुपया मिळतो, आपण मोठया प्रेमाने तो रुपया आपल्या पाकिटात घालून ठेवतो. पण त्या क्षणी हे विसरून जातो की हा रुपया चंचल आहे, हा कधीच एका जागी रहात नाही. हा सतत एकाकडून दुसर्याकडे, दुसर्याकडून तीसर्याकडे असा शेकडो – हजारो जणांच्याकडे जाणार आहे. हा ना कधी एकाचा राहीलाय….. ना कधी रहाणार. पण हे धृवसत्य मात्र आपण कधीच स्विकारत नाही.
ज्या शरीराला आपण “माझं”….. “माझं”….. म्हणून मिरवत रहातो. ते सुंदर दिसावं म्हणून सतत प्रयत्नशील असतो. ते निरोगी रहावं म्हणून सतत उपाय करत रहातो. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक प्रत्येक अवयवा करता आपण झटत रहातो. ते शरीर अखेर एक हाडामासांचा केवळ पूतळाच असतं. निव्वळ डोकं म्हणजे आपण नव्हे, निव्वळ हात म्हणजे आपण नव्हे. श्वास म्हणजे आपण नव्हे आणि वाणी म्हणजेही आपण नव्हे. हे उणंपुरं शरीरही आपलं नाही.
प्रत्यक्षात कोणत्याही उपयुक्त गोष्टीत आपलं काहीच नसतं. ह्या सर्व संसारीक गोष्टींशी आपला संबंध क्षणिक आसतो. स्वार्थाच्या आणि अहंच्या आवेगात, आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपले सहचर असल्याचं भासतं फक्त.
अपण केवळ आत्मा आहोत….! ह्या शरीराच्या पिंजर्यात बंदिस्त आहोत….! ईश्वराचाच एक अंश आहोत….!
एखाद्या क्षुद्र स्वार्थासाठी, लोभासाठी आपण आपलं सर्वस्व पणांला लावणं हे आपलं अज्ञान असतं….! आपला मूर्खपणा असतो….!
ह्या जगात आपलं काहीच नसतं….! हेच चिरंतन वास्तव आहे!
सदानंद शेणवी
चारित्र्य ही तुमची वस्तुस्थिती असते, आणि प्रतिष्ठा म्हणजे लोकांच्या मनातील तुमची प्रतिमा.
चारित्र्य तुमची स्वकमाई असते, तर प्रतिष्ठा दान.
चारित्र्य हे तुमच्या आयुष्याचं सार असतं, आणि प्रतीष्ठा फ़क्त त्याची छटा.